माझी मराठी असे मायभाषा,
हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे
गोडी नराहे सुधेमाजी आता,
पळाली सुधा स्वर्गलोकांकडे

सन 1886 साली लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन परभणीतील नानल पेठ या भागात राहाणाया पेशाने वकील असणाऱ्या व स्वातंत्र्य लढयात काम करणाया काही वकील मंडळीनी व सामाजिक जाण ठेवणाया मंडळीनी गावातीलच नव्हे, तर त्याकाळात मराठवाडयातील पहिल्या वाचनालयाची एका सार्वजनिक रिडींग रूमच्या स्वरूपात सुरूवात केली. यामध्ये अग्रणी श्री.धोंडीराज पत्की, श्री.किशनराव उमरीकर, श्री.देविदास पेडगांवकर, श्री.श्रीनिवासराव बोरीकर, श्री.गोविंदराव नानल, श्री.नारायणराव पाथ्रीकर व इतर मंडळी होती.

सन 1886 साली स्थापन झालेल्या या रिंडींगमरूमचे सन 1901 रोजी ‘गणेश वाचनालय’ असे नामकरण होऊन ते कै.अनंतराव मुळावेकर यांच्या वाडयात शिस्तबध्द रितीने सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात या वाचनालयास अनेक संकटातून जावे लागले आणि अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वाचनालयाचे सर्व संचालक एक तर तुरूंगात तरी गेले किंवा भूमीगत तरी झाले परिणामी काही काळ वाचनालयाचा दैनंदिन कारभार गुप्तरीत्या सुरूच राहिला. सन १९३५ मध्ये कै.मुकुंदराव पेडगांवकर यांनी नानलपेठ भागातील त्यांची इमारत वाचनालयाला दान दिली. वाचनालयाला स्वतःची इमारत मिळाली व वाचनालयाची प्रगती सुरू झाली पण स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पुन्हा वाचनालयाचे संचालक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभागी असल्यामुळे १९४५ पासुन १९४८ पर्यंत वाचनालय कधी चालु तर कधी बंद अशा अवस्थेत होते. सन १९४९ च्या सप्टेंबर महिन्यात थोर स्वातंत्र्य सेनानी कै.बाबासाहेब परांजपे यांच्या शुभहस्ते वाचनालयाचा पुर्नरुध्दार सोहळा अत्यंत थाटात साजरा करण्यात आला. सन १९४९ ते १९५६ पर्यंत कै. केशवराव पत्की यांनी प्रभावीपणे आणि कार्यक्षमतने वाचनालय चालविले. मुंबई विश्र्वस्त कायद्याप्रमाणे वाचनालयाची दि.१९ मे १९६४ रोजी नोंदणी करण्यात आली. वाचनालयाचा एकुण कारभार, स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग, त्यागीवृत्ती व लोकसेवेची तळमळ पाहुन महाराष्ट्र शासनाने या वाचनालयाला ‘ब’ वर्ग (दर्जा) प्रदान केला.

माजी खा. रामराव लोणीकर आणि गणपतराव पेडगांवकर यांच्या प्रयत्नामुळे नगर परिषद परभणीने शनिवार बाजार मैदानातील ९३६० चौ. फुटाचा भूखंड वाचनालयाला दिला. यासाठी या दोहोंचे वाचनालय कायमचे ऋणी राहण्यातच धन्यता मानते. गुणी च गुणरागी च विरलः सरलः जणः यांच्या बाबतीत योग्य नाही का? इथ पर्यंत सर्व ठीक झाले.चांगल्या कामात अडथळे येणे किंवा केवळ लोकउपयोगी कार्यात अवरोध निर्माण होणे ही जगराहटीच असते हा जणू नियतीचा संकेतच असावा. याचाच परिणाम की काय म्हणावे ? वाचनालय सुरळीत चालू असतानाच, ते प्रगतीपथावर असतानाच पुन्हा नव्या संकटाला समोरे गेले. आणिबाणीच्या काळात (१९७७ ते ७९) संचालक मंडळाचे काही कारणास्तव दुर्लक्ष झाले व वाचनालय परत बंद पडण्याच्या मार्गावर गेले. तथापी या प्रतिकुलतेला नघाबरता ग्रंथपाल श्री. घन यांनी हे वाचनालय धीरोदात्तपणे स्वबळावर पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण नियतीचे म्हणुनही काही संकेत असतात, त्यापुढे कदाचित मानवी प्रयत्न तोकडे पडत असतील, त्याप्रमाणे श्री. घन यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. तरी पण जो थांबला तो संपला या न्यायाला अनुसरून १९८० साली नव्या संचालक मंडळाने वाचनालय (संस्था) ताब्यात घेतले व नव्याने त्यात ‘प्राणप्रतिष्ठा’ केली.